कोरियातील ‘गुसान’ आणि पुणे या शहरांदरम्यान आता उद्योगांचे क्लस्टर उभारण्याबाबत माहितीची देवाणघेवाण होणार आहे. गुसान शहरातील व्यापारी शिष्टमंडळाने बुधवारी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’ला (एमसीसीआयए) भेट दिली. या वेळी एमसीसीआयए आणि ‘कोरिया इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स कॉर्पोरेशन’ (किकॉक्स) या संघटनांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
गुसान आणि पुण्यातील कंपन्या आपल्याकडील उद्योगाच्या संधींबाबतच्या माहितीची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचीही देवाणघेवाण करतील, असे चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गुसान शहराने वाहन आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात चांगली प्रगती केली आहे. पुण्यातील वाहन कंपन्यांना कोरियन कंपन्यांकडून वाहनांचे सुटे भाग बनवण्यातील नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेता येईल. गुसानने लघु व मध्यम उद्योगांमध्येही प्रगती केली आहे. उद्योगांच्या नवीन संधींविषयी माहिती घेणे, नवीन गुंतवणूक करणे, तसेच उद्योगासाठी ‘जॉइंट व्हेंचर्स’ स्थापन करणे आदी गोष्टी या कराराच्या माध्यमातून होऊ शकतील.’’
पुण्यात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणार
क्लस्टरसाठी पिंपरी-चिचवडचा विचार
‘पुण्यात इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचा क्लस्टर उभारण्यास केंद्राने मान्यता दिली असून मराठा चेंबरतर्फे येत्या १५ ते २० दिवसांत या क्लस्टर प्रकल्पाचा अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे,’ असे अनंत सरदेशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारतर्फे कंपन्यांचे क्लस्टर उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठीच्या सरकारच्या धोरणाचा फायदा घेत पुण्यात या कंपन्यांचा क्लस्टर स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यंत्रांच्या सुटय़ा भागांच्या उत्पादनासाठी हा क्लस्टर काम करेल. सर्व लहान कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठीच्या सर्व प्रक्रिया स्वतंत्रपणे उभारणे शक्य होत नाही. अशा उत्पादकांना या क्लस्टरचा चांगला उपयोग होईल.’’ या क्लस्टर प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवडचा विचार होत आहे, मात्र अजून प्रकल्पाची जागा निश्चित झालेली नाही, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा