पुणे : गृहकर्जाचे वाढलेले दर आणि जागतिक पातळीवरील मंदीसदृश स्थितीमुळे कर्मचारीकपात सुरू असूनही घरांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के वाढ झाली आहे. देशभरात पुण्यात सर्वाधिक ६५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था अनारॉक रिसर्चने एप्रिल ते जून या तिमाहीतील देशातील घरांच्या विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकता, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा हा अहवाल आहे. यानुसार मागील काही काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याने गृहकर्जाचे व्याजदर जास्त आहेत. याच वेळी जागतिक पातळीवर मंदीसदृश स्थिती असल्याने अनेक जागतिक, तसेच देशांतर्गत कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. असे असूनही दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे.

हेही वाचा – भामा-आसखेड जलवाहिनीचे काम वेगात; जागा देण्यास विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात घेतला जाणार ताबा

देशातील सात महानगरांमध्ये दुसऱ्या तिमाहीत एक लाख १५ हजार १०० घरांची विक्री झाली. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत ८४ हजार ९४० घरांची विक्री झाली होती. त्यात यंदा ३६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. घरांच्या एकूण विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ५१ टक्के आहे. या दोन्ही शहरांत मिळून ५८ हजार ७७० घरांची विक्री झाली आहे. देशात पुण्यात घरांच्या विक्रीत सर्वाधिक ६५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत पुण्यात घरांची विक्री १२ हजार ५०० होती. यंदा दुसऱ्या तिमाहीत ती २० हजार ६८० वर पोहोचली आहे.

देशात दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत ही संख्या ८२ हजार १५० होती. मुंबई आणि पुण्याचा नवीन घरांच्या पुरवठ्यात सर्वाधिक ६३ टक्के वाटा आहे. मुंबई आणि पुण्यात नवीन घरांच्या पुरवठ्यातील वाढ अनुक्रमे ३१ आणि २९ टक्के आहे.

हेही वाचा – सावधान! कृत्रिम स्वीटनरमुळे कर्करोगाचा धोका

गृहकर्जाच्या वाढलेला दरांचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर फारसा झालेला नाही. जागतिक पातळीवरील मंदीचे वारे असूनही घरांची विक्री वाढत आहे. प्रमुख सात महानगरांतील घरांची विक्री उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

एप्रिल ते जून घरांची विक्री

शहर – घरांची विक्री – वाढ (टक्क्यांमध्ये)

पुणे – २०,६८० – ६५
मुंबई – ३८,०९० – ४८
चेन्नई – ५,४९० – ४४
बंगळुरू – १५,०५० – ३१
हैदराबाद – १३,५७० – २१
कोलकता – ५,७८० – २०
दिल्ली – १६,४५० – ७

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune has overtaken mumbai and delhi in house sales pune print news stj 05 ssb