पुणे: राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात २३ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या सुमारे ५ लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या पुणे जिल्ह्यात असून, त्यानंतर बुलढाणा, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४६ हजारांवर पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात २३ ऑगस्टला रुग्णसंख्या ४ लाख ९९ हजार ६६१ झाली. मागील काही दिवसांपासून राज्यात बुलढाण्यात रुग्णसंख्या अधिक होती. आता राज्यात पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या झाली आहे.

आणखी वाचा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नव्हे, काहींचा वेगळा निर्णय; सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

राज्यात २३ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४६ हजार १७४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. याचवेळी पुणे महापालिकेच्या हद्दीत १२ हजार ७५५ रुग्ण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ८ हजार ३०४ रुग्ण आढळले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ४५ हजार ८६५, जळगाव २९ हजार ३०८, नांदेड २४ हजार ५४४ आणि चंद्रपूर २२ हजार ९९९ अशी रुग्णसंख्या आहे.

काळजी काय घ्यावी?

राज्यातील अनेक भागांत डोळे येणे या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे हा आजार मुख्यत्वे ॲडिनो विषाणूमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:चे घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

आणखी वाचा- लोहगावात ५८ लाखांचे मॅफेड्रॉन, हेरॉईन पकडले

आरोग्य विभागाकडून उपाययोजना काय?

आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डोळे येण्याची साथ सुरू असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ असलेल्या भागात शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune has the highest number of eye disease patients in the state pune print news stj 05 mrj
Show comments