माघ महिन्यातील रथसप्तमी म्हणजेच शुक्ल सप्तमी. या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. शहरातील संस्थांनी नुकताच तो उत्साहात साजरा केला. स्वत: आयुष्यभर सातत्याने सूर्यनमस्कार घालणारे आणि त्यासाठी इतरांना प्रोत्साहित करणारे डाॅ. अरुण दातार यांच्याशी या दिनानिमित्त श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
सूर्यनमस्काराचा प्रचार, प्रसार करावा असे का वाटले? तो कसा केलात?
मी साडेसात वर्षांचा असताना माझी मुंज झाली. त्या वेळी गुरुजी मुलांना सांगायचे, की तुला वडिलांकडून गायत्री मंत्र मिळेल, तर माझ्याकडून तुला व्यायामाचा मंत्र मिळेल. तू आता मोठा झाला असून, तुला रोज व्यायाम करायला हवा. रोज बारा सूर्यनमस्कार तरी घालायलाच पाहिजेत. तेव्हापासून मी नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. अनेकदा नंतरच्या टप्प्यावर यात नियमितता राहत नाही. पण, माझे वडीलदेखील जिम्नॅस्ट असल्याने त्यांनी मला सूर्यनमस्कार घालायला शिकवले आणि तेव्हापासून मी सातत्याने सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली.
वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांना सूर्यनमस्कारांचा काही उपयोग होतो का?
वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग हे मीही करीत होतो. पण, तेव्हाही रोज सूर्यनमस्कार घालायचोच. जिममधील ‘वर्कआउट’ केल्यानंतरही मी सूर्यनमस्कार घालणे सुरूच ठेवले. जेव्हा मी माझ्या जिममध्ये मुलांना सूर्यनमस्कार शिकवायला लागलो, तेव्हा काही काळानंतर माझ्या असे लक्षात आले, की सूर्यनमस्कारामुळे लवचीकता वाढते. वेटलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंमध्येही सूर्यनमस्काराचा फायदा होऊ शकतो. व्यायामात योग्य हालचाली होण्यासाठी मला अनेकदा सूर्यनमस्कारांचा फायदा झालेला आहे. मी १७ व्या वर्षी पुण्यात आलो. त्या वेळी व्यायामासाठी डेक्कन जिमखान्याला गेलो. मी असे जिम कधीही पाहिले नव्हते. तेथे मला व्यायामाची आवड निर्माण झाली. त्यानंतर पहिल्याच वर्षी मला आंतरमहाविद्यालयीन बॉडीबिल्डिंग स्पर्धेत बक्षीसही मिळाले. माझा त्यातील रस वाढला. तेथे मला दोन गुरू भेटले. त्यापैकी एक नाना फटाले. त्यांनी मला शिकवले आणि पुढील वर्षी मी ‘विद्यापीठश्री’ झालो. पहिल्यापासून मी व्यायाम करत होतो, खेळ खेळत होतो, पण सूर्यनमस्कार कधीही बंद पडले नाहीत. माझ्या अपघातानंतर काही वर्षे मला सूर्यनमस्कार घालताच येत नव्हते. पण पाच-सहा वर्षांनी मी पुन्हा सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. रोज दोन, पाच असे ते मी वाढवत नेले.
सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही जे विक्रम केले आहेत, ते कोणते होते?
मी ६५ व्या वर्षात पदार्पण केले, त्याच्या आदल्या दिवशी ६५ हजार सूर्यनमस्कार घालू या, असा विचार मी केला आणि त्या दिशेने प्रयत्नही केले. मग मी दर आठवड्याला साधारणपणे सातशे सूर्यनमस्कार घालायचे असे ठरवले. वजनाचे व्यायामही माझ्या आवडीचे. त्यामुळे ते करत असताना मी तीन दिवस सूर्यनमस्कार जास्त करायचो आणि तीन दिवस वजनाचे व्यायाम करायचो. जिममधील व्यायाम झाल्यानंतरही मी ७०-८० सूर्यनमस्कार घालायचोच. आठवड्याचे शेवटचे दोन दिवस शनिवार-रविवार मी सातशेला जेवढे कमी आहेत, तेवढे भरून काढायचो. त्यामुळे एका वर्षात माझे ३४ हजार सूर्यनमस्कार पूर्ण झाले आणि पुढील काही महिन्यांमध्ये माझा संकल्प मी पूर्णही केला. वयाच्या पंचाहत्तरीतदेखील असाच एक उपक्रम केला होता.
राष्ट्रीय सूर्यनमस्कार अभियानाबद्दल थोडेसे सांगाल का?
सन २००० च्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर या अभियानाचे उद्घाटन सूर्यनमस्कार घालून केले होते. त्या वेळी पावसामुळे मैदानावर चिखल झाला होता. तरीसुद्धा आम्ही सूर्यनमस्कार घालूनच अभियानाचे उद्घाटन केले. या अभियानात आम्ही शाळा-शाळांमध्ये जाऊन सूर्यनमस्काराचे फायदे सांगून सूर्यनमस्कार कसे घालायचे हे दाखवायचो. या अभियानात संपूर्ण शाळा आणि शाळेतील शिक्षकही उत्साहाने सहभागी व्हायचे. ‘व्यायाम नाही तर जेवण नाही,’ असा शब्द त्या मुलांना मागितल्यानंतर आधी थोडे घाबरतच होकार यायचा, पण नंतर सगळे विद्यार्थी उत्साहाने होकार भरायचे. अशा प्रकारे पुण्याबरोबरच, सातारा, कोकणातही शाळा-शाळांमध्ये सात वर्षे चाललेल्या या अभियानांतर्गत दोन लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या अभियानाव्यतिरिक्त व्यायाम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी विविध प्रकारचे साधे-सोपे सूर्यनमस्कारदेखील मी विकसित केले आहेत, ज्यायोगे आरोग्य उत्तम राहण्याचा फायदा होऊ शकतो.
shriram.oak@expressindia.com