पुण्यात कालपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे पुण्यातील सहकारनगरमधील अरणेश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात भिंत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचीही घटना घडली. या घटनेत टांगावाले कॉलनी परिसरात राहणारे रिक्षाचालक संतोष कदम हे पाण्यात अडकलेल्या व्यक्तीना बाहेर काढण्यास गेले आणि त्याच दरम्यान त्यांच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.

या घटनेत मृत्युमुखी पडलेले संतोष कदम यांचा मुलगा वैभव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “मुसळधार पावसामुळे काल रात्री १० च्या दरम्यान आमच्या कॉलनीमध्ये चारही बाजूंनी पाणी शिरलं. त्यामुळे या ठिकाणी असलेले शेकडो रहिवासी पाण्यात अडकून पडले. यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास अनेक जण होते. त्यामध्ये माझे वडीलही होते. तिथे असलेल्या व्यक्तिंना काही समजण्याच्या आत त्यांच्या अंगावर भिंत कोसळून, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली,” असं ते म्हणाले.

पुण्यातील सहकारनगर अरणेश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात काल रात्री मुसळधार पावसात भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेत प्रमाणे संतोष कदम (५५), रोहित आमले (१४), लक्ष्मीबाई पवार (६९), जान्हवी सदावर (३४) आणि श्रीतेज सदावर (८) अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader