Pune Helicopter Accident 3 Killed in Chopper Chash : पुण्याच्या बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधनमध्ये सकाळी ६.४५ च्या सुमारास सुमारास हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होतं. अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहचले घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याआधी देखील मुळशीमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. परंतु, त्या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा >> पुणे: रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त; अमली पदार्थ विरोधी विभागाकडून दोघांना अटक

दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईमधील जुहू येथे जात होतं. घटनेची माहिती मिळताच आमची पथकं मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत.

हे ही वाचा >> राज्यातील उद्योग पलायन ऐरणीवर! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण एमआयडीसीवरून महायुतीची कोंडी

अपघात कशामुळे झाला?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या होत्या. हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर पायलटला धुक्याचा सामना करावा लागला. हिंजवडी पोलिसांनी सांगितलं अग्निशमन दलाच्या पथकासह आम्ही आमचं पथकही घटनास्थळी पाठवलं आहे. डीजीसीए या अपघाताची चौकशी करणार असल्याचं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं आहे.