Pune Helicopter Crash: पुण्यातील बावधानमध्ये आज (२ ऑक्टोबर) सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुके असल्यामुळे बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होतं. त्यानंतर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रवास करणार होते, अशी माहिती सांगण्यात
येत आहे.

दरम्यान, क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर हे पु्ण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर काही वेळ हेलिकॉप्टरने आकाशात घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं. सुनील तटकरे हे मंगळवारी हेलिकॉप्टरने पुण्यावरून बीडमधील परळीला गेले होते. त्यानंतर ते मुंबईला आले होते, त्यानंतर ते आज मुंबईवरून पुण्याला जाणार होते. त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जाणार होतं, अशी माहिती सांगितली जात आहे.

हेही वाचा : पुणे हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी पोलिसांकडून आली नवी माहिती; म्हणाले, “टेक ऑफच्या वेळी….”

हेलिकॉप्टर कशामुळे कोसळलं?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या होत्या. हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर पायलटला धुक्याचा सामना करावा लागला. हिंजवडी पोलिसांनी सांगितलं अग्निशमन दलाच्या पथकासह आम्ही आमचं पथकही घटनास्थळी पाठवलं. डीजीसीए या अपघाताची चौकशी करणार असल्याचं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं आहे.

दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत.