शिरुर : सध्या लग्न म्हटल की महागड्या डेस्टिंगस्टेशनला जाणे, विविध नैसर्गिक पर्यटनस्थळी जावून फोटो काढणे, त्याकरीता मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचा ट्रेंड वाढू लागल्याचा जमान्यात प्री वेडिंग फोटोशूटला फाटा देत शिरुर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयातील विद्यार्थ्याना पहिली ते १० वी इयत्तांचा संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व ४२ इंच टीव्ही कॅरम बोर्ड, बॅडमिंटन किट, चेस बोर्ड व स्नेहभोजन देऊन योगेश पंदरकर व सीमा निभोरे यांनी नवा आदर्श घालून दिला.
अलीकडील काळात प्री-वेडिंग संकल्पना समाजामध्ये सुरू आहे. यासाठी लग्न जमलेले तरुण-तरुणी मोठा खर्च करतात. लग्नाआधी फोटोग्राफर घेऊन फोटोशूट केले जाते या संकल्पनेला फाटा देऊन पिंपळगाव पिसा, ता . श्रीगोंदा येथील योगेश रामभाऊ पंदरकर व सीमा राजेंद्र निंभोरे यांनी शिरूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयाला भेट देऊन या छात्रालयातील अनाथ व निराधार मुलांसाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व सेमी इंग्लिश संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व ४२ इंच टीव्ही तसेच कॅरम बोर्ड बॅडमिंटन किट चेस बोर्ड व स्नेहभोजन दिले. याप्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन शांती छात्रालयाचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले यांनी केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांनी दोन्ही कुटुंबाचे आभार मानले. असाच आदर्श समाजातील सर्व तरुणांनी घेऊन समाजामध्ये अनाथ असलेल्या मुलांसाठी कार्य करावे अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मनशांती छात्रालयच्या इमारत बांधकामाचे काम सुरु करण्यात येणार असून त्यासाठी ही मदत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी अहिल्यानगर येथील शिक्षक नेते अविनाश निंभोरे, पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई कला महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब पंदरकर व दोन्ही कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते.