पुण्यात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना रेल्वेमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी विनंती खासदार अनिल शिरोळे यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे.

‘होर्डिंग पाडताना झालेल्या चुकीने चार जणांचा हकनाक बळी गेला असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे या घटनेतील मृत आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे प्रशासनाने आपल्या सेवेत घेत त्यांच्या कुटुंबाला मदत करावी,’ अशी विनंती खासदार शिरोळे यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.

शिरोळे म्हणाले, पुण्यात घडलेली ही घटना दु:खद, दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या आधी रेल्वेने घटनेतील मृत व्यक्तींबरोबरच गंभीर व किरकोळ जखमींना मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई होत आहे, मात्र हे पुरेसे नाही. कारण, या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांचा विचार व्हायला हवा, त्यासाठी रेल्वेकडे आम्ही पीडित कुटुंबियांच्या नोकरीबाबत मागणी केली आहे.

होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताला मध्य रेल्वे जबाबदार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता तर ७ जण जखमी झाले होते. दरम्यान, रेल्वेकडून या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.