सागर कासार, पुणे
गुरुवारी १८ वर्षांच्या समृद्धीने आईला गमावले, आईच्या अस्थीविसर्जनासाठी समृद्धी, तिचे वडील आणि नातेवाईकांसोबत आळंदी येथे गेली, तिथून परतत असताना जुना बाजार येथे लोखंडी होर्डिंग त्यांच्या रिक्षेवर कोसळले आणि यात समृद्धी पोरकी झाली. तिच्या वडिलांचाही यात मृत्यू झाला असून दोन दिवसांत आई- वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने समृद्धी आणि तिच्या भावाला मानसिक धक्काच बसला आहे.
जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील मोठे लोखंडी होर्डिंग शुक्रवारी दुपारी कोसळले. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात शिवाजी देविदास परदेशी (वय ४०) यांचा समावेश आहे. समृद्धी परदेशी (वय १८) ही शिवाजी परदेशी यांची मुलगी आहे. शिवाजी परदेशी हे रिक्षाचालक आहेत. समृद्धीची आई प्रीती यांचे गुरुवारी निधन झाले. प्रीती या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
प्रीती यांच्या निधनामुळे परदेशी कुटुंबाला धक्का बसला होता. शुक्रवारी परदेशी कुटुंबीय आळंदीत प्रीती यांच्या अस्थीविसर्जनासाठी गेले होते. तिथून परतत असताना काळाने घात केला. परदेशी कुटुंबीय ज्या रिक्षेतून येत होते त्याच रिक्षेवर जुना बाजार येथे लोखंडी होर्डिंग कोसळले. यात शिवाजी परदेशी यांचा मृत्यू झाला. तर समृद्धी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई- वडिलांच्या मृत्यूमुळे समृद्धीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या मानसिक धक्क्यातून तिला सावरताच येत नाहीये. रिक्षेत समृद्धीचा भाऊ, आत्या आणि समृद्धीची आजी देखील होती. ते तिघेही यात जखमी झाले आहेत.