शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात वैद्याकीय तपासणीसाठी गेलेल्या महिलेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. लकेश लहू उत्तेकर (वय २५, सध्या रा. भैरवनगर, धानोरी, मूळ रा. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेच्या पतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पोटात वेदना होत असल्याने वैद्याकीय तज्ज्ञांनी तिला वैद्याकीय तपासणी करण्यास सांगितले होते. वैद्याकीय तपासणी केल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास महिला बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली. वैद्याकीय तपासणी करण्यासाठी महिलेला पोशाख बदलावा लागेल, असे उत्तेकरने सांगितले. त्यानंतर महिलेला दुसऱ्या एका खोलीत पाठविले. ही खोली कपडे बदलण्याची नव्हती.
वैद्याकीय तपासणी करुन आल्यानंतर महिला पुन्हा खोलीत आली. कपडे बदलल्यानंतर तेथे मोबाईल संच आढळून आला. महिलेने मोबाईलची पाहणी केली. तेव्हा त्यात चित्रीकरण करण्यात आल्याचे आढळून आले. महिलेने या घटनेची माहिती पतीला दिली.
पतीने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करुन उत्तेकरला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे.