पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा सात लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत राहायला आहेत. २४ जानेवारी रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. शनिवारी रात्री (२५ जानेवारी) रात्री अकराच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून रोकड, सोन्याचे दागिने असा सात लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.