पिंपरी-चिंचवडमध्ये रांगोळीचा छंद जोपासणाऱ्या एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी रेखाटली आहे. त्यांना ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. विजयमाला उदय पाटील असं या गृहिणीचं नाव आहे. नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी ही रांगोळी त्यांनी साकारली आहे. त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून तयार केलेली पैठणी पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे.
विजयमाला पाटील या पिंपरी-चिंचवड शहरात राहातात. त्यांना रांगोळी काढण्याचा छंद लहानपणापासूनच होता. लग्न झाल्यानंतर आपला हा छंद जोपासला. छंद जोपासण्यासाठी पती उदय पाटील यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं, असं त्या सांगतात. विजयमाला यांना काही तरी वेगळं करून दाखवायचं होतं. त्यांनी यापूर्वी अशा प्रकारची मोठी रांगोळी कधीही काढली नव्हती. त्यांना गालीचा किंवा पैठणी रांगोळीतून साकारायची होती. फोटो पाहून हुबेहूब त्यांना पैठणी काढायची असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी घरातील हॉल उत्तम पर्याय होता. पती उदय आणि मुलगा हे बाहेर गेल्यानंतर त्या मिळेल त्या वेळेत पैठणी रेखाटत होत्या.
अगोदर पती उदय यांनी त्यांच्या या पैठणीकडे कानाडोळा केला. परंतु विजयमाला या जसजशी पैठणीची रांगोळी रेखाटत गेल्या तसा वेगळाच रंग त्या पैठणीला येत होता. अगदी ती खरी पैठणी असल्यासारखी दिसायला लागली. “फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यास ती रांगोळी असल्याचे कोणाला ही विश्वास बसत नव्हता. ते कार्पेट किंवा गालीचा असल्याचं सर्वांना वाटत होतं. पैठणीची रांगोळी काढण्यासाठी तब्बल दहा किलो रांगोळी लागली शिवाय सहा रंग वापरण्यात आले,” असंही त्यांनी सांगितलं. विजयमाला यांनी रांगोळीचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही.
परंतु, त्यांच्या रांगोळीच्या छंदामुळे गेल्या तीन दिवसांपासून हॉलमधील फर्निचर हलवण्यात आलं असून टीव्ही आणि फॅन सर्व बंद ठेवण्यात आलं आहे. शिवाय गॅलीरीमधून हवा येऊन रांगोळी खराब होईल यामुळे काचेच्या खिडक्या देखील बंद केल्या आहेत. यामुळे मुलाची आणि पती उदय यांची अडचण झाल्याचं त्या गंमतीने सांगतात. गृहिणी विजयमाला यांनी काढलेली रांगोळी खरच कौतुकास्पद आहे. त्यांना भविष्यात शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीतून रेखाटायचा आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितले.