पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने करोना देशात पसरविला असल्याचा आरोप केला होता. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने खासदार गिरीश बापट यांच्या घरापासून काही अंतरावर माफी मागो आंदोलन करण्यात आले.
”महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध असो, शर्म करो, शर्म करो मोदी जी शर्म करो,फेकू मोदी हाय हाय,फेकू मोदी हाय…अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.” हे आंदोलन माजी गृहराज्यमंत्री शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. हे लक्षात घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी रमेश बागवे म्हणाले की, ”देशभरात करोना विषाणूचा प्रसार होत असताना. राज्य सरकारने सर्व उपाय योजना करण्याचे काम केले आहे. या कामाची दखल जागतिक प्रसार माध्यमांनी आणि न्यायालयाने देखील घेतली आहे. राज्य सरकाराच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्याबद्दल जे विधान केले आहे. ते निषेधार्थ असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या शिवजयंती आहे, त्यापूर्वी राज्यातील जनतेची माफी मागावी,अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू.” तसेच आज आम्ही त्यांच्या पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर आंदोलन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.