पुणे : कर्वेनगर भागात पादचारी ज्येष्ठ महिलेला धक्का देऊन मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा हिसकावणाऱ्या चोरट्याला अलंकार पोलिसांनी अटक केली. दागिने हिसकावणारा चोरटा मध्य प्रदेशातील इराणी टोळीतील असल्याचे उघडकीस आले असून, अलंकार पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

हमीद अफसर खान (वय ३०, सध्या रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. होशिंगाबाद, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. याबाबत एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला २२ जानेवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडल्या. नवसह्याद्री सोसायटीतील रस्त्यावर दुचाकीस्वार चोर हमीद खान याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. ते चोरताना मंगळसूत्राचा अर्धवट भाग तुटला. त्यानंतर खान दुचाकीरून काही अंतर गेला. मंगळसूत्राचा अर्धवट राहिलेला भाग हिसकावण्यासाठी तो पुन्हा तेथे आला. त्याने ज्येष्ठ महिलेला धक्का दिला आणि अर्धवट तुटलेला भाग हिसकावून पळ काढला. या घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले. चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

पोलिसांनी पसार चोराचा माग काढण्यास सुरुवात केली. जवळपास १०० ते १५० ठिकाणांचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणात पसार झालेला चोरटा हमीद खान असल्याचे निष्पन्न झाले. खान याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. खान याने महिलांकडील दागिने चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण, उपनिरीक्षक अभिजित काळे, गणेश दीक्षित, करिश्मा शेख आदींनी ही कामगिरी केली.

Story img Loader