पुणे : भरधाव मोटारीने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना गुलटेकडीतील उड्डाणपुलावर घडली. अपघातानंतर जखमी ‌झालेल्या दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार झाला. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रकाश बाफना (वय ५८, रा. भूमीव्हिला सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश बाफना, त्यांची पत्नी आणि मित्र सहकुटुंब शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री टिळक रस्त्यावरील उपाहारगृहात गेले होते. तेथून बाफना दाम्पत्य दुचाकीवरुन रात्री साडेदहाच्या सुमारास घरी निघाले होते. गुलटेकडी ते मार्केट यार्ड दरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार बाफना यांना धडक दिली.बाफना दाम्पत्य रस्त्यात पडले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, तसेच बाफना दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक भरधाव वेगात पसार झाला.

हेही वाचा…Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

अपघातानंतर बाफना दाम्पत्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाफना यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस नाईक विनोद धामणगावकर तपास करत आहेत.

Story img Loader