पुणे : स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) स्थानकांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी एसटी महामंडळामध्ये स्वतंत्र सुरक्षारक्षक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.राज्यभरातील ‘एसटी’ महामंडळाच्या स्थानकांमध्ये तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक आदी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही मिसाळ यांनी दिले आहेत.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यमंत्री मिसाळ यांनी ‘एसटी’ महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी वाहतूक अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांच्यासह एसटी, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, ‘स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. एसटी महामंडळाच्या स्थानकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. सुरक्षा दक्षता अधिकारीही नव्याने नेमले जाणार आहेत. सीसीटीव्हींची यंत्रणा अपुरी असून कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. स्वारगेट बस स्थानकाचे ‘सुरक्षा लेखापरीक्षण’ (सेफ्टी ऑडिट) करण्यात येत असून अधिकारी किंवा ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.’राज्यातील ‘एसटी’महामंडळाच्या स्थानकांमध्ये तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक आदी सुविधा राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
आयुर्मान संपलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत
‘एसटी’ महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात आयुर्मान संपलेल्या बस आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १५ वर्षांपेक्षा जास्त किंवा दोन लाखांहून अधिक किलोमीटर अंतर पार केलेल्या बस मोडीत काढण्याबाबत निर्देश आहेत. संबंधित बसेस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.