पुणे : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या ‘आदित्य एल १’ या सौर मोहिमेतील ‘सूट’ (सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप) या दुर्बिणीने सूर्याच्या कमी ऊर्जेच्या वातावरणातील सौर ज्वाळांची छायाचित्रे टिपली आहेत. ही छायाचित्रे सूर्याच्या ‘निअर अल्ट्राव्हायोलेट बँड’मधील असून, सूर्याच्या वातावरणातील तीव्र घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ही छायाचित्रे उपयुक्त ठरणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूट दुर्बिणीची निर्मिती केलेल्या आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राने (आयुका) ही माहिती दिली. सौर ज्वाळांचे संशोधन आयुकातील प्रा. दुर्गेश त्रिपाठी आणि प्रा. ए. एन. रामप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सौम्या रॉय यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने केले. या संशोधनात मणिपाल ॲकॅडमी फॉर हायर एज्युकेशन, यूआर राव सॅटेलाइट सेंटर, आयसर- कोलकाता येथील सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सोलर सिस्टम रीसर्च, तिरुअनंतपुरम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश होता. या संशोधनाचा शोधनिबंध द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

सूट उपकरणाने २२ फेब्रुवारी २०२४ रोजी एक्स ६.३ श्रेणीतील सौर ज्वाळांचे निरीक्षण केले. या सौर ज्वाळा अत्यंत तीव्र उद्रेकांपैकी एक आहेत. सूट उपकरणाने निअर अल्ट्राव्हायोलेट बँडमध्ये चमक वाढल्याचे ओळखले. सूर्यमालेची पूर्ण कक्षा यापूर्वी कधीही इतक्या तपशीलवार चित्रीत झालेली नाही. या निरीक्षणांमुळे सूर्याच्या वातावरणातील तीव्र उद्रेकांबाबत नवीन दृष्टी मिळून सूर्याच्या वातावरणातील विविध स्तरांतून वस्तुमान आणि ऊर्जा कशी हस्तांतरित केली जाते याच्या जटिल भौतिक प्रक्रिया अधोरेखित होतात. या संशोधनामुळे दीर्घकालीन सैद्धान्तिक अंदाज प्रमाणित होण्यासह सौर ज्वाळांचे व्यामिश्र भौतिकशास्त्र समजून घेण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे.

सूटचे प्रमुख संशोधक आणि मुख्य वैज्ञानिक प्रा. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले, ‘सौर ज्वाळांच्या छायाचित्रांमुळे पहिल्यांदाच सूर्याची प्रचंड शक्ती सखोलपणे पाहता येत आहे. त्यातून निअर अल्ट्राव्हायोलेट बँडमधील रहस्य उलगडत आहे. सूटच्या महत्त्वपूर्ण निरीक्षणांनी सौर भौतिकशास्त्रात एक क्रांतिकारक क्षण आला आहे. आदित्य एल १ आणि सूट उपकरणामुळे सूर्याच्या अभ्यासाचे नवे युग सुरू होत आहे.’

सौर ज्वाळांविषयी…

सौर ज्वाळा अचानक सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात साठलेली चुंबकीय ऊर्जा सोडून उत्सर्जन आणि ऊर्जायुक्त कणांची सोडवणूक करतात. अशा घटनांमुळे अवकाशातील हवामानावर आणि भू-अवकाशावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रेडिओ संप्रेषणात व्यत्यय, उपग्रहांच्या कार्यप्रणालीवर परिणाम, वीजपुरवठ्यात अडथळे, विमान प्रवाशांसाठी धोके निर्माण होऊ शकतात. सौर ज्वाळांचा गेल्या शंभर वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. आदित्य एल १वरील सूट या उपकरणाने पहिल्यांदाच याबाबतची निरीक्षणे उपलब्ध करून दिली आहेत.