रंगीबेरंगी आरसे आणि झुंबरांनी सजलेल्या भव्य स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना होणार आहे.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये स्वप्नमहाल साकारण्यात येणार आहे. महिरपीमध्ये लावण्यात येणारे दिवे, मोराची भव्य कमान, रंगीबेरंगी आरशांनी चकाकणारी सजावट आणि २० भव्य झुंबरांनी हा स्वप्न महाल सजणार आहे. या महालात काल्पनिक वृक्षाला लावण्यात येणाऱ्या हलत्या झोपाळ्यावर शारदा गजाननाची मूर्ती विराजमान होणार आहे. ३२ फूट लांब आणि १६ फूट रूंद असा भव्य झोपाळा असेल. विशाल ताजणेकर यांनी स्वप्न महालाचे कलादिग्दर्शन केले आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
हे देखील वाचा – पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी
उत्सव काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम –
गणेश चतुर्थीला बुधवारी (३१ ऑगस्ट) मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि अपर्णा गोगावले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता शारदा गजाननाची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सव काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी मंदिर परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून दोनशे सुरक्षा स्वयंसेवक काम करणार आहेत.
शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार –
“अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी एक वही आणि पेन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाकडे संकलित झालेले शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.” अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.