पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या स्थानकावरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होण्यास आजपासून (२४ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. प्रवाशांना आता स्वंतत्र विश्रामकक्ष, वातानुकुलीत सुविधांयुक्त प्रतिक्षा कक्ष, पुरुष महिलांसाठी स्वतंत्र सुविधा मिळत विमानप्रवास आणखी सुलभ झाला आहे. नव्या टर्मिनलवरून विमानांचे उड्डाण होणार असल्याने त्या नियोजनाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर मोहोळ यांनी समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर स्थलांतरणासाठी (इमिग्रेशन) आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली होती. मात्र पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विश्रामकक्षासह इतर काही सुविधा उभारण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे विमानतळ प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. सद्य स्थितीला विमानतळावरुन सध्या ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आले.
हेही वाचा : शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
‘पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’ अशी माहिती मोहोळ यांनी दिली.