पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ ) मनुष्यबळ केंद्रीय गृह विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर लगेचच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.
हेही वाचा…पुण्यात झिकाचा धोका वाढताच महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल
याबाबत माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले, ‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
हेही वाचा…प्रवाशांनो, आता व्हॉट्स ॲपवर करा तक्रार! बेशिस्त रिक्षा, कॅब, खासगी बसवर तातडीने कारवाई होणार
पुणे विमानतळाच्या कामांना गती
मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात पुणे विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. यात धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला परवानगी मिळाली तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले, या दोन्ही विषयांसदर्भात मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. आणि आता नवे टर्मिनल खुले होण्याचाहीमार्गही मोकळा झाला आहे. या तीनही प्रश्नांचा पाठपुरावा मोहोळ यांनी स्वतः केला होता.