पुणे : गेल्या आठ दिवसांपासून जगभरातील चित्रपटांची पर्वणी दिलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘आरमंड’ हा नॉर्वेजियन चित्रपट प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला. तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘सांगला’ या चित्रपटाने पटकावला.

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे आयोजित २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) समारोप गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला. पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, विश्वस्त सतीश आळेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. चित्रपट निवड समितीमध्ये मार्को बेकिस, मार्गारिवा शिल, पेट्री कोटविका, तामिन्हे मिलानी, जॉर्जे स्टिचकोविच, सुदथ महादिवुलवेवा, उर्वशी अर्चना, अनिरुद्ध रॉय चौधरी यांचा समावेश होता. दिग्दर्शक हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दोन तरूण मुलांच्या मनोवस्थेचा प्रवास आरमंड या चित्रपटात मांडला आहे. तर उन्हाळ्यात विहिरीच्या तळाशी साचणाऱ्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची कहाणी दिग्दर्शक रावबा गजमल यांनी ‘सांगला’ या चित्रपटातून मांडली.

महापालिकेचे आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, ‘पिफ हे कल्पनांचे आदानप्रदान करण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना चित्रपट निर्मितीसाठी फायदा होईल. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यालयासाठी महापालिकेकडून जागा देण्यात येणार आहे. त्यासाठीचे सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल. सावळकर म्हणाले, ‘चित्रपट क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. या उद्योगात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. राज्यातील पर्यटनाला चित्रपटांद्वारे चालना देण्याचा विचार शासनाकडून करण्यात येत आहे.’

आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – आरमंड, दिग्दर्शक – हाल्फदान उलमन टोंडेल
  • प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक- नाओमी जाये, चित्रपट- डार्केस्ट मिरियम
  • ज्युरी स्पेशल मेन्शन – एप्रिल, दिग्दर्शक- देआ कुलुम्बेगाश्विली
  • ज्युरी स्पेशल मेन्शन – टू अ लँड अननोन, दिग्दर्शक- महदी फ्लेईफेल
  • एफटीआयआयचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार – मनकाप नोकवोहम

मराठी चित्रपट पुरस्कार

  • संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट – सांगला, दिग्दर्शक- रावबा गजमल
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे, चित्रपट- स्नो फ्लॉवर
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता – अनिल दाभाडे, चित्रपट- सांगला
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – छाया कदम, चित्रपट- स्नो फ्लॉवर
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – अमेय वसंत चव्हाण, चित्रपट- रावसाहेब
  • विशेष परीक्षक पुरस्कार – अभिनेत्री दिग्दर्शिका स्वाती सदाशिव कडू (निर्जली), अभिनेत्री भक्ती घोगरे (गिरण)

Story img Loader