पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) ४८ देशांमधील चित्रपट पाहायला मिळणार असून ९ ते १६ जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार आहे. यावर्षी इस्राईलच्या ‘अॅना अरेबिया’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाटककार सतीश आळेकर, चित्रपट समीक्षक समर नखाते, नाटय़समीक्षक मकरंद साठे, पिफचे सचिव रवी गुप्ता आदी उपस्थित होते.
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे बारावे वर्ष आहे. यावर्षी तैवान, हंगेरी, इस्राईल, स्पेन या देशांसह ४८ देशांमधील २०० चित्रपट या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित न झालेले काही मराठी चित्रपटही या महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत. पुण्यातील ७ चित्रपटगृहांमधील ११ स्क्रीन्सवर हे चित्रपट पाहता येणार आहेत. जगभरातील चित्रपटांबरोबरच गेल्या वर्षभरात निधन झालेल्या कलाकारांना आदरांजली म्हणून त्यांचे काही निवडक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. विनय आपटे, मन्ना डे, राजीव पाटील, पंडित रवी शंकर, ऋतुपर्ण घोष, शं. ना. नवरे या कलाकारांवरील लघुपट किंवा त्यांचा सहभाग असलेले चित्रपट महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहेत.
महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी जागतिक चित्रपट विभागामध्ये ५५० चित्रपट आणि मराठी चित्रपट विभागामध्ये ३५ चित्रपट सहभागी झाले आहेत. त्यापैकी जागतिक विभागातून १४ आणि मराठी विभागातून ७ चित्रपटांची महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. पटेल यांनी दिली. यावर्षी संस्कृती, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती पाहून चित्रपटांची निवड करण्यात आली आहे, असे नखाते यांनी सांगितले.
महोत्सवासाठी नोंदणी सुरू
या महोत्सवासाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली असून २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार आहे. ई-स्वेअर, आयनॉक्स, कोथरूड व सातारा रस्ता येथील सिटी प्राईड या ठिकाणी नाव नोंदणी करता येणार आहे. यावर्षी महोत्सवाच्या माहिती पुस्तकासह ७०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि फिल्म सोसायटीचे सभासद यांच्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
महोत्सवाची ठिकाणे
राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, ई-स्वेअर, आयनॉक्स, सिटी प्राईड (आर डेक्कन, सातारा रस्ता, कोथरूड आणि अभिरूची सिंहगड रस्ता)