महोत्सव ३ ते १० मार्च कालावधीत दुहेरी पद्धतीने

पुणे : जगभरातील विविध देशांच्या १२० अभिजात चित्रपटांची पर्वणी देणारा यंदाचा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार आहे. ३ ते १० मार्च या कालावधीत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दुहेरी पद्धतीने हा महोत्सव होणार असून महोत्सवात सहभागी होण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (१५ फेब्रुवारी) सुरू झाली आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित असेल. त्यानुसार महोत्सवामध्ये काही विशेष कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी दिली. पिफच्या आयोजन समितीचे रवी गुप्ता, अभिजित रणदिवे, सतीश आळेकर, समर नखाते आणि मकरंद साठे या वेळी उपस्थित होते.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी चित्रपट महोत्सवाच्या संकेत स्थळाच्या http://www.piffindia.Com माध्यमातून मंगळवारपासून करता येईल.

सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि वेस्टएंड मॉल, औंध येथील सिनेपोलीस चित्रपटगृह येथे गुरुवारपासून (१७ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसात या वेळेत नोंदणी करता येईल. ऑनलाईन आणि चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठीची नोंदणी वेगवेगळी करावी लागेल.

जागतिक स्पर्धात्मक चित्रपट

जागतिक स्पर्धात्मक श्रेणीत निवडल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये इरेझिंग फ्रँक (हंगेरी), १०७ मदर्स (स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक, युक्रेन), मैक्साबेल (स्पेन), द एक्झाम (जर्मनी, इराक, कुर्दिस्तान, कतार),  प्ले ग्राउंड (बेल्जीयम), फ्रान्स (फ्रान्स), द लेजनिअर (इटली, फ्रान्स), अ‍ॅज फार अ‍ॅज आय कॅन वॉक (सर्बिया, फ्रान्स, बल्गेरिया, लक्झेमबर्ग, लिथुएनिआ), मिर्स इन द डार्क (झेक प्रजासत्ताक), सबमिशन (पोर्तुगाल, फ्रान्स), जय भीम (भारत), अमीरा (इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमीरात, सौदी अरेबिया), बिटविन टू डॉन्स (तुर्कस्तान, रोमेनिया, फ्रान्स, स्पेन) आणि हाउस अरेस्ट (रशिया) या १४ चित्रपटांचा समावेश आहे.

Story img Loader