35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेची जगभरात एक वेगळी ओळख आहे. पण मागील दोन वर्षात करोना महामारीमुळे अनेक निर्बंध आपल्या सर्वांनावर होते. त्याच दरम्यान रुग्ण संख्या कमी झाल्याने, यंदा मॅराथॉन स्पर्धा पहाटे सुरुवात न करता मध्यरात्री स्पर्धा सुरू करण्यात आली असून ही येत्या काळात निश्चित रोल मॉडेल ठरेल, असे मत राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून इतर स्पर्धां प्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा देखील होऊ शकली नाही. पण यंदा करोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने, ही स्पर्धा घेण्याचे नियोजन आयोजकांनी केले. या स्पर्धेचं 35 व्या वर्षात पदार्पण करीत असताना, यंदा प्रथमच मध्यरात्री ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेला खेळाडूंनी चांगलाच प्रतिसाद दिला. या स्पर्धेचं उदघाटन राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक अभय छाजेड, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
यावेळी सुनिल केदार म्हणाले की, करोना महामारी नंतर सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन केले गेले. या स्पर्धेमध्ये पुण्यासह देशाच्या विविध भागातील तब्बल 5 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्या सर्वांमध्ये एकच जल्लोष पाहण्यास मिळत आहे. ही चांगली बाब असून येत्या काळात देखील विविध स्पर्धेचं आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
35 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सारसबागेजवळील सणस ग्राऊंड येथून सुरुवात झाली.सणस ग्राउंड-बाजीराव रस्ता-शनिपार-अप्पा बळवंत चौक- शनिवार वाडा नवा पुल- रामसर बेकरी चौकातून परत याच मार्गानि वळून बाजीराव रोड-सणस ग्राऊंड, सिंहगड रस्ता दांडेकर चौक- गणेशमळा- संतोष हॉल- गोयल गंगा चौक-लोकमत भवन व तेथुन परत सणस ग्राऊंड ही पहिली 21 कि. मी. ची फेरी व पुन्हा त्याच मार्गाने 21 कि.मी. ची दुसरी फेरी पूर्ण करून सर्व धावपटू स्पर्धक सणस ग्राऊंड येथे स्पर्धा पूर्ण करतील. त्यानंतर 10 किलोमीटर पुरुष आणि महिला स्पर्धा 5.30 सुरू होईल. सणस मैदान,महालक्ष्मी मंदिर सारसबाग,दांडेकर पूल,गणेश मळा,संतोष हॉल तेथून पुन्हा त्याच मार्गे सणस मैदानावर संपेल.