पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने कार्टूनिस्ट्स् कंबाईनच्या सहकार्याने शुक्रवारपासून (५ मे) भरविण्यात येणाऱ्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे उद्घाटन व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाममध्ये जगभरातील २५४ तर भारतातील शंभर व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला असून, रंग-रेषांचे आविष्कार पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.
बालगंधर्व कलादालन येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर तीन दिवसांच्या या महोत्सवात व्यंगचित्रांवरील परिसंवादासह नवोदित आणि दिग्गज व्यंगचित्रकारांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहेत. परिसंवादामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत. तसेच रविवारी (७ मे) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व्यंगचित्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. व्यंगचित्रकार चारुहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >पिंपरी महापालिकेतील ३८७ जागांसाठी मे महिन्यात परीक्षा
व्यंगचित्र ही मार्मिक कला आहे. समाजातील अनेक घडामोडींवर आपल्या व्यंगचित्र कलेतून व्यंगात्मक टिप्पणी करून व्यंगचित्रकार समाज जागृतीचे काम करत असतात या भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गरड यांनी सांगितले.