पुणे : दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारजे भागातील रामनगर परिसरात रविवारी ही घटना घडली.

याप्रकरणी निवास नारायण अकोले (वय ४२, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची खोटी माहिती अकोले याने पोलीस नियंत्रण कक्षाला (११८) दिली. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला रविवारी (९ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख, उपनिरीक्षक आर. आर. भरसट यांनी घटनास्थळी धाव घेतली. गस्त घालणाऱ्या पोलिसांचे पथक त्वरीत तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा रामनगर भागात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली नसल्यचे उघडकीस आली. पोलीस नियंत्रण कक्षाला अकोले याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे चैाकशीत उघड झाले.
दिशाभूल करणारी माहिती देणे, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.

Story img Loader