पुणे : शहरातील एक हजार सराइतांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली. शहरातील १०९ पोलीस चौक्यांमध्ये सराइतांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. शहरातील पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सराइतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. गेल्या पाच वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, माेक्का कारवाई केलेल्या सराइतांची चौकशी करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर पडलेल्या सराइतांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील गुंड टोळ्यांचे प्रमुख, साथीदारांना गुन्हे शाखेत बोलावून त्यांची झाडाझडती घेतली होती. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना ताकीद दिली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराइतांची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा – पुणे : मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वेधशाळा चौकात वाहतूक बदल
सराइत ज्या भागात वास्तव्यास आहेत, त्यांना त्या भागातील पोलीस चौकीत बोलावण्यात आले. पोलीस चौकीत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचा पत्ता, नातेवाईकांची माहिती घेण्यात आली. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी सराइतांची माहिती संकलित केली. शहरात गेल्या महिन्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. गोळीबारात येरवडा भागातील एका हाॅटेल चालक तरुणाचा मृत्यू झाला होता. वाहन तोडफोड, दहशत माजविणे, तसेच गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता पोलीस चौकी स्तरावर सराइतांची चौकशी सुरू केली. गुरुवारी (२ एप्रिल) शहरातील एक हजार सराइतांची चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – ‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत झाला महत्त्वाचा बदल… किती वेळा होणार परीक्षा?
दरम्यान, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस चौक्यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शहरातील १०९ पोलीस चौक्यांच्या परिसरात राहणाऱ्या एक हजार सराइतांची चाैकशी करण्यात आली. पोलीस चौकीत तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समस्येचे निराकरण व्हायला हवे. त्यामुळे पोलीस चौक्यांचे सक्षमीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.