पुणे : देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांना मोठी मागणी दिसून आली आहे. कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सह-कार्यालयीन जागा अर्थात को-वर्किंग अथवा फ्लेक्स स्पेसचे प्रमाण २३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यंदा फ्लेक्स स्पेसमध्ये पुणे आघाडीवर असून शहरात १२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. त्या खालोखाल बंगळूरुमध्ये ९ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत.
‘नाइट फ्रँक इंडिया’ने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात देशांतील आठ महानगरांतील कार्यालयीन जागांच्या व्यवहारांचा जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आढावा घेण्यात आला. या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ६२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत त्यात ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कार्यालयीन जागांमध्ये सर्वाधिक व्यवहार बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील कार्यालये, जागतिक सुविधा केंद्रे यांचा वाटा सर्वाधिक आहे. हा वाटा अनुक्रमे ५९ लाख चौरस फूट आणि ५० लाख चौरस फूट आहे. त्यानंतर को-वर्किंग स्पेसचा वाटा ३८ लाख चौरस फूट आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत हा वाटा ३४ लाख चौरस फूट होता.
हेही वाचा >>> धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
को-वर्किंग स्पेस म्हणजे काय?
एकाच मोठया जागेत काही कंपन्यांनी आपापली कार्यालये थाटणे, म्हणजे को-वर्किंग. अशा जागा निर्माण करणारे स्वतंत्र व्यावसायिकही असतात. अनेक छोटया कंपन्या किंवा नवउद्यमींना कार्यालयीन जागांचे भाव परवडत नाहीत. त्यामुळे स्वतंत्रपणे कार्यालये थाटण्याऐवजी अशा को-वर्किंग स्पेसचा आधार घेतला जातो. कार्यालयात लागणाऱ्या अनेक सुविधा आपसात वाटून वापरल्या जात असल्याने खर्चात बचत होते.
को-वर्किंग स्पेसचे व्यवहार (लाख चौरस फुटांमध्ये)
महानगर – जागा
पुणे – १२
बंगळूरु – ९
दिल्ली – ८
मुंबई – ३
अहमदाबाद – ३
हैदराबाद – २
चेन्नई – २
कोलकाता – ०
एकूण – ३८
सध्या कार्यालयीन जागांना मागणी वाढलेली दिसून येत आहे. देशाचे आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायाची संधी यांमुळे अनेक कंपन्या त्यांचा व्यवसाय विस्तार करीत आहेत. त्यातही को-वर्किंग स्पेसला मागणी वाढत आहे. – शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया