लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेतील तंत्रज्ञान भागीदारीवर भर दिला आहे. आधुनिक संशोधनाचा सेमीकंडक्टर उद्योग हा कणा असून, पुणे हे संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र असल्याने ते द्विपक्षीय सेमीकंडक्टर भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा सूर अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
भारत आणि अमेरिकेतील सेमीकंडक्टर तंत्रज्ञान भागीदारीत वाढ करण्यासाठी मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित ‘ट्रस्ट’ या परिसवांदात इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी सहभागी होते. यात स्थानिक तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजकांनी भाग घेतला. सेमीकंडक्टर क्षेत्रातील उदयोन्मुख बदल, उद्योगासमोरील आव्हाने, संधी आणि धोरणात्मक शिफारशी यावर या वेळी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया पुणेचे संचालक अजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
‘सेमीकंडक्टर उद्योगात पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण, पुणे उद्योग, शिक्षण आणि धोरणकर्ते यांच्या सहभागातून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. प्रत्येक उच्च तंत्रज्ञान भागीदारीत पुणे आघाडीवर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असून, जागतिक पातळीवरील उद्योगांशी पुण्याची भागीदारी आहे. भविष्यातील सेमीकंडक्टर उद्योगाला दिशा देण्याच्या दृष्टीने पुणे महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील प्रवक्ते ग्रेग पार्डो यांनी सांगितले.
सेमीकंडक्टर भागीदारीवर भर
भारत आणि अमेरिका यांच्यातील सेमीकंडक्टर भागीदारीवर भर दिला जात आहे. त्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात ‘ट्रस्ट’ या परिसंवादाच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला परिसंवाद मुंबईत १५ जानेवारीला झाला. त्यानंतर दुसरा नागपूरमध्ये २८ फेब्रुवारीला झाला, तर तिसरा पुण्यात २८ मार्चला झाला. या परिसंवाद मालिकेचा समारोप मुंबईत जून महिन्यात होणार आहे.