पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मंगळवारी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ झालेल्या घोषणाबाजीनंतर प्राचार्यांनी पोलिसांना पाठविलेल्या एका पत्रामुळे बुधवारी नव्याच चर्चेला तोंड फुटले. देशविरोधी घोषणा दिल्यागेल्याबद्दल पाठविण्यात आलेल्या पत्रावरून फर्ग्युसनचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी घुमजाव केले. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
महाविद्यालयात देशविरोधी घोषणा दिल्या आहेत का, याचा तपास करावा, असे पत्र प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिले होते. या पत्राचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होऊ लागल्यावर लगेचच प्राचार्यांनी त्या पत्रामध्ये टायपिंग करताना चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास तपास करावा, असे पत्रामध्ये म्हणायचे होते. पण टाईप करताना ‘असल्यास’ शब्द राहून गेल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बदलला असल्याचे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य पोलिसांना पत्र पाठवत असताना त्यात एवढी गंभीर चूक कशी काय होऊ शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आलोक सिंग याच्याबरोबर आयोजित केलेल्या संवादाच्या कार्यक्रमांत मंगळवारी घोषणाबाजी झाली. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात महाविद्यालयांतील वातावरण मात्र ढवळून निघाले आणि मुळात या कार्यक्रमाला परवानगी होती का, यावरून दावे-प्रतिदावे रंगले. अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग सध्या पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आलोक याच्या ‘ट्रथ ऑफ जेएनयू’ या कार्यक्रमाचे अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आयोजन केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयांत मंगळवारी सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाला परवानगी आहे का, या मुद्यावरून अभाविप विरुद्ध डाव्या विचारसरणीच्या तसेच आंबेडकरी चळवळीतील संघटनांमधील विद्यार्थी असा वाद झाला. विद्यार्थ्यांनी कन्हैयाला पाठिंबा देणाऱ्या घोषणा सुरू केल्या आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघटनेच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही संघटनांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धाने महाविद्यालयात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले होते.

Story img Loader