पुणे : मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने रविवार पेठेतील सराफी पेढीतून चोरट्याने १३ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – राज्यातील धरणांत ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणीसाठा
हेही वाचा – मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारच्या दरात वाढ
याबाबत सराफी पेढीच्या मालकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा दागिन्यांची शुद्धता तपासण्याचा व्यवसाय आहे. पेढीत दागिने घडवून त्याची शुद्धता तपासली जाते. रविवार पेठेतील श्री शितळादेवी मंदिर परिसरात व्यावसायिकाची पेढी आहे. दोन दिवसांपूर्वी सराफी पेढीत दुपारी चोरटा आला. चोरट्याने मूकबधिरांप्रमाणे हावभाव केले. मूकबधीर संस्थेसाठी देणगी द्यावी, असे पत्रक त्याने पेढीच्या मालकाला दिले. त्यांनी चोरट्याला ५० रुपये देणगीपोटी दिले. त्यानंतर चोरट्याने सराफी पेढीच्या मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. सोन्याचे दागिने ठेवलेला डबा चोरून चोरटा पसार झाला. डब्यात १३ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने होते. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.