पुणे : पुण्यातून कर्नाटकला जाणारी आणि कर्नाटकातून पुण्याला येणारी ‘एसटी’ महामंडळाची बस सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुणे स्वारगेट स्थानकातून सोडल्या जाणाऱ्या दैनंदीन बस कोल्हापूर येथपर्यंतच जात असून तेथून माघारी फिरवल्या जात आहेत. त्यामुळे याचा फटका सीमावर्ती भागातील जनसामांन्यांना बसत असून विविध मार्गांनी प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, दोन्ही राज्यांच्या सीमेवर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) अधिकाऱ्यांमध्ये बैठका सुरू असून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत बस सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘एसटी’ महामंडळाकडून देण्यात आली.
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये ‘एसटी’ मंडळाच्या बसचालकाला कन्नड येत नसल्याने कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील कार्यकर्त्यांनी देखील कर्नाटकमधील बस अडवून बसला काळे फासले. त्यामुळे दोन राज्यांमध्ये तणाव वाढला असताना दोन्ही राज्यातील एसटी महामंडळांकडून बस सेवा बंद करण्यात आली आहे. सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुणे स्वारगेट स्थानकावरून दररोज जाणाऱ्या सहा ते सात बस रद्द करण्यात आल्या आहेत. या बस केवळ कोल्हापूरपर्यंतच जात असून तेऊन माघारी वळविल्या जात असल्याचे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बस सेवांवर परिणाम
पुण्याच्या स्वारगेट स्थानकावरून कर्नाटकासाठी दिवसभरात सात बस जातात. त्यामध्ये बिदर आणि बेळगावी प्रत्येकी दोन आणि गुलबर्गा, विजापूर, कलबुर्गी, गाणगापूर येथे प्रत्येकी एक अशा बस धावत असतात, तर कर्नाटक राज्यातून पुणे स्वारगेट स्थानकावर दैनंदिन सहा बस येत असतात. ही बससेवा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली असून अद्याप याबाबत कुठलाचा तोडगा निघालेला नाही. दोन्ही महामंडळाकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असल्या तरी या मार्गावरील बस बंद ठेवल्याने सेवेवर परिणाम झाला आहे, तर सीमेवरील नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
दोन राज्यात आणखी तणाव निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी’ महामंडळाच्या बसेस पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय होताच या मार्गावरील बस सेवा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सुरू करण्यात येईल. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, ‘एसटी’ महामंडळ, पुणे विभाग