पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये हडपसर येथून शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघातून केवळ तीन उमेदवार सध्या तरी जाहीर केले आहेत. येत्या कालावधीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती उमेदवार जाहीर करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे हे खडकवासला मतदार संघातून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले होते. रमेश वांजळे यांची राज्यभरात ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख होती. त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली. तसेच विधिमंडळांमध्ये रमेश वांजळे आणि आमदार आबू आझमी यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेने पहिला होता. विधिमंडळातील तो प्रसंग कायम चर्चेत राहिला आहे. तर २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले. त्यानंतर रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांनी २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर धायरी भागातून पुणे महापालिकेची निवडणुक लढवली आणि त्या निवडणुकीत विजयी देखील झाल्या.

हेही वाचा : पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक, कारवाईची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस

त्याच दरम्यान मयुरेश वांजळे यांनी खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे इच्छा बोलवून दाखवली. त्यानंतर काल मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये खडकवासला मतदार संघातून मयुरेश वांजळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मयुरेश वांजळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आमच्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय वारसा आहे. आई आणि वडिलांनी खडकवासला भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. पण मागील १३ वर्षाच्या कालावधीत खडकवासला विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांनी (भीमराव तापकीर) कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाही. यामुळे हा मतदार संघ अनेक वर्ष मागे राहिला आहे. याबाबत माझ्या मनात खंत राहिली आहे. यामुळे मी खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित असून या निवडणुकीत मनसेचा शंभर टक्के झेंडा हा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : पुणे : राहुल गांधी यांच्या हजेरीसाठी पतियाळा न्यायालयामार्फत समन्स, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत रमेश वांजळे हे विजयी झाल्यानंतर विधिमंडळांच्या सभागृहात आमदार आबू आझमी यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेने पहिला होता. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांचा (रमेश वांजळे) जो पॅटर्न होता. तोच आपला पॅटर्न असणार आहे. मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या अस्मितेकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले तर आम्ही त्याला ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune khadakwasla mns candidate mayuresh wanjale warns on marathi identity issue svk 88 css