संतत कोसळणाऱ्या पाऊसधारा. अधुनमधून उठणारे हुंदके. थिजलेले डोळे. वेदनांचा डोंगर छातीवर घेऊन वावरणारे भकास दुखी चेहरे.. आणि दुसरीकडे मदतकार्याची धावपळ, बघ्यांची गर्दी आणि सांत्वनासाठी आलेले मंत्र्यांचे, पुढाऱ्यांचे ताफे.. हे गुरुवारचे माळीण गावचे चित्र. डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या धक्क्य़ाने माळीण गावचा परिसर मुळातून हादरला आहे. तेथील लोकांच्या मनात अनामिक भीतीने घर केल्याचे दिसून येत आहे. बुधवारची संपूर्ण रात्र या परिसराने भीतीच्या छायेत जागून काढली.
एखादे गाव बघता बघता गडप होऊ शकते या धक्क्य़ातून परिसरातील गावे सावरलेली नाहीत. गावातील वाचलेल्या घरातील माणसांनी घर सोडून जाणे पसंत केले आहे. माळीण गावातील परसवाडी, उंडेवाडी, पोटेवाडी या वाडय़ा या दुर्घटनेतून वाचल्या. मात्र, सध्या या वाडय़ांमध्येही माणसांचा मागमूस दिसत नाही. माळीणच्या अलीकडे असलेले अडिवरे गाव, माळीणच्याच जवळचे उपासे गाव या गावांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सतत पडणाऱ्या पावसाने नागरिकांच्या भीतीमध्ये अधिकच भर पडली आहे. अनेकांनी आपले नातेवाईक सुखरूप असल्याची आशाही सोडून दिली आहे.
माळीणमधील मदतकार्याने मात्र अद्यापही म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. सतत पडणारा पाऊस, डोंगरावरून येणारे पाण्याचे आणि मातीचे लोंढे यांमुळे मदतकार्य संथ गतीने सुरू आहे. यांमुळे हे मदतकार्य अजून पाच-सहा दिवस चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आतापर्यंत ८ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून ४१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी १८ मृतदेहांवर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आता मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याचे नागरिक आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजूनही ४७ घरे ढिगाऱ्याखाली असून, साधारण १३० ते १५० नागरिक त्यात अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.मदतकार्यासाठी सध्याची साधने आणि मनुष्यबळ पुरेसे आहे. मात्र, पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण होण्यास अजून चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पुणे विभागाचे प्रमुख आलोक अवस्थी यांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. या दुर्घटनेने तेही हादरून गेल्याचे दिसत होते. येथे एक गाव होते असे आज वाटतच नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृतांच्या नातलगांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा