दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या ७५ इतकी झाली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १०० जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३७ महिला आणि दहा लहान मुलांचा समावेश आहे.
सतत कोसळणारा पाऊस आणि मातीचा चिखल यामुळे हे मृतदेह काढणे, त्यांचे शवविच्छेदन करणे, ओळख पटवणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे ही सारी प्रक्रिया अतिशय जिकिरीची होऊन बसली आहे. परिणामी या परिसरात असह्य़ दुर्गंधी दाटू लागली असून गावातील अन्य रहिवासी तसेच मदतकार्यात करणारे जवान व नागरिक यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. बचावकार्य पूर्ण होण्यास आणखी २-३ दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रु. देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

Story img Loader