इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये गेले अनेक दिवस वाळूची मोठी तस्करी सुरू असून या वाळू तस्करांवर कारवाई करता- करता प्रशासनास नाकी नऊ आले आहेत . या महिन्यात इंदापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार जीवन बनसोडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी संयुक्तरित्या तिसऱ्यांदा उजनी जलाशयात चालणाऱ्या वाळू तस्करीतील बोटी फोडून कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारंवार बोटी फोडून कारवाई केली तरी वाळूची तस्करी चालतेच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .वाळू तस्करांवर वारंवार पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील मनुष्यबळ वापरात येत असल्याने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन मधील त्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा ताण येत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे . अनेक वेळा कारवाई करून वाळू माफीयांच्या बोटी फोडल्या तरी पुन्हा एकाच दिवसात तशीच यंत्रणा उजनी धरणांमध्ये उभे राहते. याचा प्रत्यय याच महिन्यामध्ये इंदापूरकरांना आला.

या महिन्यांमध्ये प्रशासनाच्या वतीने सलग तिसऱ्यांदा कारवाई करून दहा-बारा बोटी फोडल्या. मात्र पुन्हा- पुन्हा हे वाळू माफीये आपले डोके वर काढून आपला मूळ धंदा सुरूच करत असल्याचे चित्र उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये वारंवार दिसते. उजनी धरणामध्ये गेल्या ४५ वर्षापासून साचलेला व कोट्यावधी रुपयांचा शासनाला महसूल मिळवून देणारा मोठा वाळूचा साठा उपलब्ध आहे . मात्र शासन स्तरावर उजनीतील वाळूच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली धोरणही ठरले. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत न झाल्याने वाळू माफियांना रात्रंदिवस व वाळूची तस्करी करण्याची मोठी संधी मिळाल्याने कोणत्याही ठिकाणी वाळू माफियांना बोटीद्वारे वाळू काढण्यास अडचण येत नाही .काळीभोर चांगल्या प्रतीची वाळू उजनी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असून या काळ्या सोन्यावर वाळू माफिया नेहमीच डल्ला मारत आहेत. शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत असून पर्यावरणाला ही मोठी हानी पोहोचत आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये अनेक स्थलांतर पक्षी विणीच्या हंगामासाठी येतात. उजनी धरणाच्या पाण्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा सर्वत्र अधिवास असतो .मात्र या वाळू माफियांना त्याचे ना सोयर ना सुतक. त्या़ंच्या अकराळ- विक्राळ बोटी रात्रंदिवस उजनी धरणामध्ये अवैधरित्या वाळूची तस्करी करताना दिसून येतात. प्रशासनाकडुन सातत्याने बोटी फोडून कारवाई केली जाते. मात्र कोणत्याही वाळू तस्करावर अद्यापही जरब बसवण्याइतपत कारवाई झालेली आढळून येत नाही. आज पर्यंत वाळू माफियांच्या जप्त केलेल्या वाळूच्या साठ्याचा खच तहसील कार्यालयाच्या आवारात पडला असून ठिकठिकाणी अजूनही उजनी धरणाच्या कडेला वाळूचे साठे असण्याची शक्यता आहे.

आज जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व वनगळी येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या चार बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी स्फोट घडवून बुडवून नष्ट केल्या. सदर कारवाई मध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, काठी मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, संदीप मैलागिर, प्रताप गायकवाड, राजाभाऊ पिसाळ, अमोल हजगुडे , भास्कर घोळवे, तहसील शिपाई संग्राम बंडगर, पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई, अरुण कांबळे , विजयकुमार करे व आप्पा गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी लक्ष्मण सूर्यवंशी व नंदू जाधव, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील ड्रोण सर्वेअर संकेत बाबर व बबलू नरळे यांनी भाग घेतला.