पुणे : ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने प्रसिद्ध गायक आणि संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांना पहिला लतादीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापुढे दरवर्षी एका कलाकाराला हा पुरस्कार दिला जाणार आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भारती मंगेशकर यांच्या हस्ते देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हेही वाचा : मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा, महापालिकेसमोर प्रक्षोभक भाषण
यानिमित्ताने आयोजित ‘असेन मी नसेन मी’ या लतादीदींनी गायलेल्या मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमात अवधुत गुप्ते, मोहन जोशी, आस्ताद काळे, अमृता सुभाष, विभावरी जोशी, मधुरा दातार, मनीषा निश्चल, केतन गोडबोले आणि राधा मंगेशकर यांचा सहभाग आहे. याच कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या अंतिम इच्छेनुसार मंगेशकर कुटुंबीयांच्यावतीने दीनानाथ रुग्णालयाला प्रदान करण्यात येणाऱ्या कृतज्ञता निधीचा धनादेश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.