आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातल्या अनेक खाद्य उद्योगांना जशी मोठी परंपरा आहे, तशी ती छोटय़ामोठय़ा हॉटेलांनाही आहे. इतकंच नाहीतर अगदी रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करणाऱ्यांच्या धंद्याला परंपरा असल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला पुण्यात अनुभवता येतात. लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकाजवळ असलेलं ‘शंकरराव वडेवाले’ हे असंच एक खाऊचं ठिकाण. लक्ष्मी रस्त्यावर आपण बेलबाग चौकाकडून कुंटे चौकाकडे जायला लागलो, की कुंटे चौकाच्या थोडं अलीकडे एक गल्ली डावीकडे आत जाते. इथे आता रस्ताभरून कपडय़ांचा बाजार झाला आहे. याच रस्त्यावर डावीकडे आत वळल्यावर ‘काकाकुवा मॅन्शन’ ही एक जुनी प्रसिद्ध इमारत आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारातच कमानीखाली ‘शंकरराव वडेवाले’ अशी एक अगदी छोटी पाटी आणि खवय्यांची मोठी गर्दी असं दृश्य नेहमी दिसतं. या ठिकाणाला खवय्यांनी ठेवलेलं नाव म्हणजे ‘शंकररावांचा पोहे-वडा.’

आपण कुठेही वडा खायला गेलो तर एक दृश्य हल्ली सर्वत्र दिसतं. ते म्हणजे हल्ली सर्वत्र वडा-पाव मिळतो. ‘शंकरराव वडेवाले’ यांची खासियत ही आहे, की त्यांच्याकडे तुम्हाला वडय़ाबरोबर पाव अजिबात मिळणार नाही. इथला वडा हा त्याची झणझणीत चव घेत घेतच खायचा असतो. शिवाय त्याच्याबरोबर मिळणारा मिरचीचा ठेचा ही खवय्यांसाठीची आणखी एक पर्वणी असते. गरम वडा आणि त्याच्यावर हिरवी मिरची, मीठ, दाण्याचं कूट आणि लिंबू यांच्या मिश्रणातून तयार होणारा झटका वडय़ाबरोबर खाताना प्रत्येक जण खाण्यातला आनंद घेतो. मध्यंतरी या वडय़ाबरोबर पाव द्यायलाही सुरुवात करण्यात आली होती. पण रोज येणाऱ्या खवय्यांनीच त्याला नम्रपणानं नकार देत सांगितलं, की आम्ही इथे चविष्ट वडा खायला येतो. त्याच्याबरोबर पाव अजिबात देऊ नका. त्यानंतर पाव बंद करण्यात आला, हे वेगळं सांगायलाच नको.

‘शंकरराव वडेवाले’ यांच्याकडे बटाटा पोहेही आवर्जून खायला हवेत. इतरत्र सगळीकडे आपल्याला कांदा पोहे मिळतात, पण हा असा एक ठिय्या आहे, की इथे वर्षांनुर्वष बटाटे पोहेच दिले जात आहेत. पोहय़ातला हा बटाटादेखील तेलात तळलेला नसतो तर उकडलेला बटाटा कुस्करून तो फोडणीत मिसळून ती फोडणी पोहय़ांना लावून नंतर बटाटे पोहे तयार केले जातात. त्यामुळेच खरा खवय्या इथे आला, की तो ‘एक पोहे-वडा’ अशी ऑर्डर देतो. तीस रुपयांतली ही इथली भरपेट डिश.

भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर वापरून तयार केले जाणारे बटाटा पोहे किंवा दाण्याचं कूट, साबुदाणा आणि जिरं वापरून केला जाणारा किंचित कडक असा साबुदाणा वडा किंवा पॅटीस.. अशा इथं मिळणाऱ्या कोणत्याही पदार्थाचा आस्वाद घेतला तरी हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्या लगेच लक्षात येतं. अगदी छोटी जागा, अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवले जाणारे पदार्थ, खवय्यांची सदैव गर्दी, शिवाय दरही अगदी वाजवी.. असा हा सगळा मामला आहे. अर्थात, इथं जायचं तर वेळेकडेही लक्ष द्यावं लागतं. सकाळी साडेसात ते साडेअकरा आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच-सहा या वेळेत इथं जावं लागतं.

शंकरराव देसाई आणि पांडुरंग नाचरे हे दोघे परममित्र होते. दोघेही दोन वेगवेगळय़ा हॉटेलांमध्ये वेटर म्हणून कामाला होते. त्यातलं एक हॉटेल पुढे बंद पडलं आणि मग दोघांनी मिळून १९६७ मध्ये बटाटे वडे विक्रीचा फेरी व्यवसाय सुरू केला. चार-पाच र्वष दोघेही रस्तोरस्ती फिरून वडे विकायचे. नंतर ‘काकाकुवा मॅन्शन’च्या दारात त्यांना जागा मिळाली आणि ‘शंकरराव वडेवाले’ हा व्यवसाय तिथं स्थिरावला. सुरुवातीची अनेक र्वष या दोघांनी फक्त बटाटे वडा आणि बटाटे पोहे हे दोनच पदार्थ विकले. या दोघांच्या कुटुंबातील दुसरी आणि तिसरी पिढी आता या व्यवसायात आहे. या पिढीनं साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, शिरा, उपीट, पॅटीस या पदार्थाची जोड धंद्याला दिली. नारायण नाचरे, महेश देसाई, शंकर नाचरे, अनिल नाचरे ही पिढी आता हा व्यवसाय सांभाळते. देसाई आणि नाचरे कुटुंबीयांची जशी पुढची पिढी या व्यवसायात आहे, तशी खवय्यांचीदेखील तिसरी पिढी आता इथं नेहमी येते. कमालीची सचोटी, कष्ट आणि ग्राहकाला जे देईन ते उत्तमच देईन या वृत्तीनं सुरू झालेल्या या व्यवसायाची परंपरा पुढच्या पिढय़ांनीही टिकवून ठेवली आहे. मला वाटतं, हीच या धंद्याची खासियत आहे आणि त्यामुळेच ‘एक पोहे-वडा’ हा इथं येणाऱ्या खवय्यांसाठी परवलीचा शब्द बनला आहे.

कुठे आहे?

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाजवळ महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राजवळ.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune laxmi road shankarrao poha vada center