पुणे : पुण्यात पहिल्या सहामाहीत पुनर्विक्री वगळून ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. त्यांची किंमत २८ हजार कोटी रुपये आहे. एकूण व्यवहारात २०१९ च्या तुलनेत ९० टक्के वाढ झाली आहे. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी असल्याचे क्रेडाई सीआरईच्या अहवालातून समोर आले आहे.
सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि डेटा ॲनालिस्ट राहुल अजमेरा यांनी हा अहवाल जाहीर केला. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> रेल्वेसाठी साखरेवरील निर्यात निर्बंध ‘कडू’; पण नेमकं कारण काय?
याबाबत अभिषेक गुप्ता म्हणाले की, पुण्यात २०२३ मध्ये पहिल्या सहामाहीत ४५ हजार १६२ घरांची विक्री झाली. पुण्यात २०१९ च्या पहिल्या सहामाहीत ३२ हजार २५० घरांची विक्री झाली होती. याचाच अर्थ करोनापूर्व काळाच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ४० टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा >>> Teachers Day 2023: शिक्षक दिनाची भेट! १ हजार २३५ शिक्षकांना ‘धन्वंतरी’चा लाभ
घरांची किंमत सरासरी ६३ लाख रुपये
पुण्यात यंदा पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ६३ लाख रुपये आहे. ही किंमत २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी जास्त असल्याचे समोर आले आहे. घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. तसेच, २०१९ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १ कोटी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत तबल २५० टक्के वाढ झाली आहे.