पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर पडलेले सराइत, तसेच त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी (१३ मे) आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दररोज मध्यरात्री पोलिसांकडून तपासणी मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात येत असून, गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी, लोणी काळभोर परिसरातील सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
हेही वाचा : …अन पाकिस्तानला माहीत आहे, त्यांचा बाप दिल्लीत बसलाय – देवेंद्र फडणवीस
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलैश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून दररोज रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागातील सराइतांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराइतांची माहिती त्वरीत नजीकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात सराइतांची तपासणी करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या माेहिमेत गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके सहभागी झाली आहेत.
अमाेल झेंडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा