आभासी विश्वात अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणे हे किती धोकादायक आहे, याची प्रचिती दररोज येत असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने आतापर्यंत एकट्या पुणे शहरातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी वेळोवेळी आवाहन करूनही उच्चशिक्षितांपासून अगदी सामान्य व्यक्तीही आमिषांच्या जाळ्यात सापडत आहेत. फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. दररोज अशा प्रकारचे किमान दोन ते तीन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात. या आभासी विश्वातील फसवणूक रोखण्याचे आव्हान एकटे पोलीस पेलू शकणार नाहीत. त्यासाठी सामान्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

कमी श्रमात झटपट पैसे कमाविण्यासाठी अनेक जण धडपडतात. शेअर बाजारात गुंतवणूक हा झटपट पैसे कमाविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम जाणून घेणे आवश्यक असते. गुंतवणूक केल्यानंतर ‘सबुरी’चा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. ‘शेअर बाजारातील गुंतवणूक’ या विषयावर वर्गही आयोजित केले जातात. असे असताना अनेक जण समाज माध्यमातून अनाेळखी व्यक्तीकडून पाठविण्यात येणाऱ्या संदेशांवर डोळेझाक करून विश्वास ठेवतात. अगदी बाजारात भाजीपाला खरेदी करायला गेल्यानंतर निवडून, पारखून भाजी खरेदी करणारी व्यक्ती आभासी विश्वातील अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवते. हाच विश्वास फसवणुकीच्या गुन्ह्यात पहिली पायरी ठरते.

कोणतीही शहानिशा न करता अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला जातो. चोरट्यांचे समाज माध्यमातील खात्यावर सुटाबुटातील छायाचित्र असते. या छायाचित्राला भुलून अनेक जण त्याच्या संपर्कात येतात. त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती घेतली जाते. सायबर चोरट्यांच्या खात्यावर सुरुवातीला किरकोळ रक्कम पाठविली जाते. चोरटेही त्यांना किरकोळ रकमेवर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देऊन जाळ्यात ओढतात. एकदा का परतावा मिळाला, की हाव वाढते. हीच लालसा आयुष्यभर कमावलेली पुंजी एका झटक्यात घालवू शकते. काही जण तरीही कर्जबाजारी होऊन गुंतवणूक करतात.

गेल्याच आठवड्यात एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या संचालकासह तिघांची, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून साडेनऊ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत निवृत्त संचालकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार संचालक निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. २०२१ मध्ये त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेतला हाेता. तेथे आरोपींची त्यांची ओळख झाली. विश्वास ठेवून तक्रारदार संचालकासह तिघांनी तब्बल साडेनऊ कोटी रुपये गुंतवले. आरोपी कार्यालय बंद करून पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

अशाच प्रकारची आणखी एक घटना नुकतीच शहरात घडली. पण, या वेळी सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका खासगी कंपनीची ४१ लाख रुपयांची फसवणूक टळली. पोलिसांनी चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेला केली. पोलिसांनी तत्परतेने तपास केल्याने खासगी कंपनीला रक्कम परत मिळवून देण्यात यश आले. या घटनेत तक्रारदार अधिकाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून संदेश पाठविण्यात आला होता. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशात चोरट्याने कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक असल्याची बतावणी केली.

संदेश पाठविण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक व्यक्तिगत असल्याची बतावणी करण्यात आली. एका महत्त्वाच्या बैठकीत असून, तातडीने कंपनीच्या वित्त विभागातून ४१ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्याची सूचना संदेशात दिली होती. त्यानंतर कंपनीच्या वित्त विभागाकडून बतावणी करणाऱ्या चोरट्याच्या खात्यात ४० लाख ९० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले हाेते, ते परराज्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी परराज्यातील बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती केली.

संबंधित कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा रक्कम वळविण्यात आली. यापूर्वीही सायबर पोलिसांनी तत्परतेने तपास केल्याने फसवणुकीचे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य झाले आहे. पण, मुळात फसवणुकीच्या गुन्ह्यांना बळी न पडण्यासाठी नागरिकांनीच सजग आणि दक्ष असणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती, मोबाइल क्रमांकावरून होणाऱ्या संपर्कास प्रतिसाद न देणे हाच यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.

rahul.khaladkar@expressindia.com