पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गाच्या तीनपदरीकरणासह चौपदरीकरणालाही रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी राज्य शासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिक तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला काही प्रमाणात खर्चाचा भार उचलावा लागणार आहे.
पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तीनपदरीकरणाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून, रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी काही प्रमाणात निधीही मंजूर करण्यात आला आहे. तीनपदरीकरणासाठी रेल्वेकडून तीनदा सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याबाबतचा अहवालही रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. उपनगरीय वाहतुकीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या लोहमार्गाचा विस्तार अत्यंत गरजेचा झाला आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता तीनपदरीकरण करतानाच चौथ्या मार्गाबाबतही विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चौथ्या लोहमार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. लोहमार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमिनीच्या संपादनाशिवाय २३०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन व रेल्वेचा वाटा असणार आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या पन्नास टक्के रकमेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे पालिका व िपपरी-चिंचवड पालिकेला आपापल्या हद्दीतील लांबीनुसार या प्रकल्पासाठी वाटा उचलावा लागणार आहे. त्याबाबत राज्य शासनाकडून कळविण्यात आले आहे.
पुणे-लोणावळ्याच्या सध्याच्या दुपदरी मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ांची संख्या लक्षात घेता नव्या गाडय़ा सुरू करण्यावर मर्यादा येत आहेत. त्याचप्रमाणे पुणे-लोणावळा मार्गावर लोकलच्या सेवेचा विस्तार करण्यातही अडचणी आहेत. केवळ तीनपदरीकरण झाले, तरीही पुणे-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे उपनगरीय वाहतुकीतही वाढ करणे शक्य होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा