निधी देण्यास पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्राधिकरणाचा नकार

पुणे ते लोणावळा उपनगरीय आणि मुंबईपर्यंतच्या रेल्वे वाहतुकीच्या विस्तारासह पुणे, िपपरी-चिंचवड तसेच ग्रामीण विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचा असलेला पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पाच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. या प्रकल्पासाठी आपापल्या हिश्श्याचा निधी देण्यास पुणे व िपपरी-चिंचवड पालिकेसह आता िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही नकार दिला आहे. निधी मिळण्याच्या सर्वच मार्गावर रेल्वेला ‘लाल कंदील’ दाखविला जात असल्याने प्रकल्पाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गाच्या तिहेरीकरणाची मागणी गेल्या १५ वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या मागील अर्थसंकल्पात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ९४० कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली. त्यानंतर आवश्यक असलेले सर्वेक्षण पूर्ण करून विभागाने रेल्वे बोर्डामध्ये या प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला वेग आला होता. रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे पुणे-लोणावळा दरम्यान लोहमार्गाचे तीन पदरीकरणच नव्हे, चार चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून सर्वेक्षण व मंजुरीच्या फेऱ्यांमध्ये अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. आता मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आराखडाही तयार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेच्या अर्थसंकल्पात रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या निधीबाबतही स्पष्टता करण्यात आली आहे. त्यामुळे लगेचच काम सुरू होईल, अशी शक्यता असताना आपापल्या हिश्श्याचा निधी देण्यास सुरुवातीला पुणे महापालिकेने आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नकार दिला. आता िपपरी प्राधिकरणानेही निधीस नकारघंटा दाखविली. पुणे- लोणावळा दरम्यान लोहमार्ग विस्तार झाल्यास उपनगरीय वाहतुकीचा विस्तार होणार आहे. पुणे-मुंबई दरम्यान गाडय़ाही वाढू शकणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा नागरिकांनाच होणार आहे.

प्रकल्पाच्या खर्चाची विभागणी कशी?

पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणासाठी जमिनीचा खर्च वगळता २३०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात राज्य शासन व रेल्वेचा समान हिस्सा असणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी स्थापलेल्या कंपनीच्या सूचनेनुसार पीएमआरडीएच्या बैठकीत  प्रकल्पाच्या निधीबाबत चर्चा झाली होती. पुणे ते लोणावळा हा ७० किलोमीटरचा नवा रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के आणि पुणे, िपपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांच्यामार्फत ५० टक्के (११५३ कोटी) रक्कम उभी करावी लागणार आहे. त्यात पुणे पालिकेचा हिस्सा ३९२ कोटी, िपपरी पालिकेचा २५१ कोटी, तर िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सुमारे शंभर कोटींचा हिस्सा आहे

Story img Loader