पुणे- मुंबई दरम्यान अधिकाधिक चांगली रेल्वे सेवा देण्याच्या दृष्टीने व गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिहेरीकरणाच्या प्रकल्पाला आता वेग आला आहे. पुणे विभागाने या प्रकल्पाचा आराखडा रेल्वे बोर्डाला नुकताच सादर केला असून, त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.
पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे पुणे- लोणावळा लोकलची सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने पुणे- लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गाच्या तिहेरीकरणाची मागणी पंधरा वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून करण्यात येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागानेही सातत्याने प्रवाशांच्या या मागणीचा पाठपुरावा करून रेल्वे बोर्डाकडे ही मागणी मांडली आहे. रेल्वे अर्थसंकल्पामध्येही वेळोवेळी हा विषय घेण्यात आला होता. पण, त्याला हवी तशी गती मिळत नव्हती. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी हा प्रकल्प केवळ सर्वेक्षणावरच थांबला होता.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात हा विषय घेतला व त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. प्रकल्पाला उशीर झाल्यामुळे आता त्याच्या खर्चामध्ये तीन पटीने वाढ झाली असली, तरी अर्थसंकल्पात निधीसह हा प्रकल्प आल्याने पुणेकर रेल्वे प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केले होते. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाल्याने पुणे विभागानेही या प्रकल्पात लक्ष घातले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण पूर्ण करून विभागाने रेल्वे बोर्डामध्ये या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा पाठविला आहे.
पुणे- लोणावळा दरम्यान लोहमार्गाचे तिहेरीकरण करायचे झाल्यास या मार्गाच्या डाव्या बाजूला रेल्वेची बहुतांश जागा उपलब्ध आहे. मात्र, काही ठिकाणी रेल्वेला जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पाबरोबरच या मार्गावर येणाऱ्या स्थानकांची रचनाही बदलावी लागणार आहे. तिहेरीकरणाबरोबरच फलाटांची रुंदी व लांबीही वाढवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पादचारी पुलांची उभारणी करावी लागणार आहे. याबाबतचा आराखडा पुणे विभागाकडून सादर करण्यात आला असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. आराखडा सादर झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे. रेल्वे बोर्डाकडून या प्राथमिक आराखडय़ाचा अभ्यास करून अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे कामही वेगात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे काही दिवसांतच अंतिम आराखडा तयार होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. काम पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागणार असला, तरी या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर पुणे- मुंबई दरम्यानही रेल्वे सेवा विस्तारणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना मिळू शकणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा