पुणे- लोणावळा दरम्यानच्या रेल्वेच्या लोकल सेवेच्या प्रवासी संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कधी लोकलला उशीर होतो किंवा काही अपरिहार्य कारणास्तव लोकल रद्दही केली जाते. त्याबाबतची माहिती प्रवाशांना वेळेत न मिळाल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. पण, लोकल सेवेबाबतची सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध झाली, तर प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकणार आहे. हीच गरज लक्षात घेऊन रेलयात्री संस्थेने एक अॅप तयार केले असून, त्याद्वारे प्रवाशाला मोबाईलवरही लोकलची माहिती मिळू शकणार आहे.
पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या चार लोकल आहेत. या लोकल दिवसभरात ४४ फेऱ्या करतात. त्याचा लाभ दररोज सुमारे लाखभर प्रवासी घेतात. विद्यार्थी, छोटे व्यापारी, कामगार यांच्याकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. कमी खर्चात प्रवास होत असल्याने लोकलच्या सेवेला अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल काही वर्षांपूर्वी बारा डब्यांची करण्याची करण्यात आली. त्यातूनही प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली. पुणे व िपपरी-चिंचवड शहर तसेच तळेगाव-लोणावळ्यापर्यंतच्या भागाचा होणारा विस्तार लक्षात घेता, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रवासी वाढत असताना लोकल सेवेच्या समस्याही वाढत आहेत. अशा स्थितीत लोकलच्या प्रवाशांना माहितीची मदत व त्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या उद्देशाने रेलयात्रीचे संस्थापक मनिष राठी यांच्या पुढाकाराने ‘लोकल ट्रेन्स’ हे मोफत अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक, विलंबाने धावणाऱ्या गाडय़ा, रद्द होणाऱ्या गाडय़ा, फलाट क्रमांक आदी अद्ययावत व उपयुक्त माहिती त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. हे अॅप गुगल स्टोअरवरून मोफत डाऊनलोड केले जाऊ शकते. नोकिया व िवडोज फोन वापरणाऱ्यांना हे अॅप मोफत आहे. पुणे- लोणावळा मार्गावरील कासारवाडी, पिंपरी, आकुर्डी, देहूरोड, भेगडेवाडी, मळवली, कामशेत, वडगाव, चिंचवड, तळेगाव आदींसारख्या एकूण १७ स्थानकांबाबतची माहिती अॅपवर उपलब्ध होणार आहे.
पुणे- लोणावळा लोकलची माहिती आता मोबाईलवर
रेलयात्री संस्थेने एक अॅप तयार केले असून, त्याद्वारे प्रवाशाला मोबाईलवरही लोकलची माहिती मिळू शकणार आहे.
First published on: 19-03-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune lonavla local trains information on local trains ap