पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली. चारही धरणांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २०.०० अब्ज घनफूट (टीएमसी) ६८.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात दहा मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात सात मि.मी, पानशेत धरण परिसरात चार मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २०.०० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी रात्री चारही धरणांत १९.८६ टीएमसी पाणीसाठा होता. गुरुवारी रात्रीच्या तुलनेत शुकवारी सकाळी ०.१४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग थांबवला –

दरम्यान, खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   २.०६      ५५.६३
वरसगाव               ८.३९     ६५.४४
पानशेत                 ७.५७      ७१.१२
खडकवासला        १.९७      १००.००
एकूण                   २०.००    ६८.६१

Story img Loader