पुणे : पुणे मेट्रोच्या स्थानकांवर वाहनतळाची सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या केवळ आठ मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सुविधा आहे. आता त्याच ठिकाणी सशुल्क वाहनतळाची सुविधा महामेट्रोने सुरू केली आहे. त्यामुळे आधी मोफत मिळणाऱ्या या सुविधेसाठी प्रवाशांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. या वाहनतळांवर दुचाकीसाठी १५ रुपयांपासून पुढे शुल्क आकारले जाणार आहे.
पुणे मेट्रोची एकूण २० स्थानके सध्या सुरू आहेत. यापैकी पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ आणि आयडियल कॉलनी या आठ स्थानकांवर वाहनतळाची सुविधा आहे. या ठिकाणी आधी वाहनतळाची सुविधा प्रवाशांसाठी मोफत होती. आता महामेट्रोने या ठिकाणी कंत्राटदाराची नियुक्ती करून ही सेवा सशुल्क केली आहे. यामुळे यापुढे मेट्रो प्रवाशांना वाहनतळाची सुविधा मोफत मिळणार नाही.
हेही वाचा…लहान मुलांचे आता मेंदूज्वरापासून संरक्षण! सरकारचा लसीकरण कार्यक्रम जाणून घ्या…
मेट्रो स्थानकांवरील वाहनतळ सायकली, दुचाकी, चारचाकीसह व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध आहे. या सर्व वाहनतळांमध्ये बूम बॅरिअर, वीज आणि सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ॲपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट, पार्किंग क्षमता दर्शविणारे डिजिटल बोर्ड याही सुविधा असणार आहेत, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.
हेल्मेटसाठी दिवसाला पाच रुपये भाडे
मेट्रोतून प्रवास केलेले तिकीट असल्यास प्रवाशांना वाहनतळाच्या शुल्कात २५ टक्के सवलत मिळेल. प्रवाशांसाठी वाहनतळाची मासिक पास सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो प्रवासी हा दुचाकी घेऊन आल्यास वाहनतळावर त्याला हेल्मेट ठेवण्यासाठीही सुविधा असणार आहे. प्रवाशांना या सुविधेसाठी २४ तासांचे पाच रुपये शुल्क आकारले जाईल.
हेही वाचा…पिंपरी : महापालिका शाळांतील मुलांसाठी २९ कोटींचे गणवेश
मेट्रो स्थानकांवरील वाहनतळ शुल्क (रुपयांत)
- वेळ – सायकल – दुचाकी – चारचाकी – बस/ व्यावसायिक वाहने
- दोन तासांपर्यंत – २ १५ – ३५ – ५०
- दोन ते सहा तासांपर्यंत – ५ – ३० – ५० – ७०
- सहा तासांपेक्षा जास्त – १० – ६० – ८० – १००