पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागांतील ४७२ मार्गांपैकी अवघे दोनच मार्ग नफ्यात असल्याने पीएमपीची संचलन तूट वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पीएमपीला एका बससाठी प्रतिकिलोमीटर ११४ रुपये खर्च करावा लागत असून, अवघे ५३ रुपये नफा मिळत असल्याने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तूट ७६६ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीचे चाक आर्थिक कोंडीत अडकल्याने जुन्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संचलन तूट कमी होईल, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील ३.६ लाख किलोमीटर अंतरात पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यानुसार दिवसाला विविध ४७२ मार्गांवरून बस धावतात. त्यापैकी केवळ २ मार्गांतून पीएमपीला चांगले उत्पन्न मिळत आहे. उर्वरित ४७० मार्ग तोट्यात आहेत. सर्वांधिक तोट्यातील २१ ते ३० किलोमीटर अंतरामधील ८८ मार्ग आहेत. या मार्गांवर गेल्या वर्षभरात २८२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

४० कोटींनी तोटा वाढला

पीएमपीला प्रवासी वाहतुकीतून प्रतिदिन सुमारे दीड कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु कर्मचाऱ्यांचे पगार, कंत्राटदारांच्या बसचे भाडे आणि प्रवासी नसलेल्या वाहतुकीच्या खर्चामुळे पीएमपीची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. परिणामी यंदाच्या आर्थिक वर्षातील तोटा ४० कोटींनी वाढला आहे.

तुटीची ही प्रमुख कारणे

  • पीएमपीची २००७ मध्ये स्थापना झाल्यापासून, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे ४७२ मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत.
  • शुल्क आणि पासच्या किमतीत वाढ नाही.
  • करोनानंतर प्रवाशांच्या संख्येत घट, तिकीट विक्री आणि पासच्या महसुलात घट
  • नादुरुस्त बस मार्गावर असल्याने अचानक बंद पडणे, बिघाड, दुरुस्ती-देखभाल खर्च, बस सेवा आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंत्राटी बसच्या दरात वाढ

पीएमपीची स्थापना झाल्यापासून जुने मार्ग कायम आहेत. त्यातच या वर्षी ताफ्यात नवीन बस दाखल होणार आहेत. तोट्यात असलेल्या बसमार्गांचे पुनर्नियोजन करणार आहोत. मार्गांच्या सुसूत्रीकरणासाठी नवीन योजना केली जाईल. -दीपा मुधोळ-मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल

पीएमपीएमएल एका दृष्टिक्षेपात

  • एकूण बस – १,६५०
  • दररोजचे प्रवासी – १२ लाख (सरासरी)
  • दररोज प्रवासी उत्पन्न – १.५ कोटी
  • दैनंदिन प्रवासाचे अंतर – ३,६०,००० किलोमीटर
  • एकूण मार्ग – ४७२
  • एकूण बस थांबे – ४,३००