पुणे : महावितरणच्या अभय योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून वीजबिलांच्या थकबाकीतून वीज ग्राहकांना मुक्त होता येणार आहे. वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागते. मात्र, विजेची गरज नसली, तरीही येणाऱ्या वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ‘महावितरण’च्या अभय योजनेद्वारे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर अकृषक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘महावितरण’चे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी ही माहिती दिली.

पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेसाठी आतापर्यंत ३३,३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहेत. २९,५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यातील १२,०९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यातील १,६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यातील ४,७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील ६,४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४,५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. अभय योजनेत सहभागी होण्यासाठी ‘महावितरण’च्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे.

अभय योजनेची वैशिष्ट्ये

  • घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी.
  • मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीजजोडणी.
  • मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट.
  • मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय.
  • ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना संधी.

Story img Loader